
कराड : पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वे डेमो प्रवासी गाडीच्या (क्र. ११४२५) इंजिनजवळील ॲक्सल बॉक्सला कराड येथील रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी आग लागण्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. रेल्वेच्या एकूण सात डब्यात सुमारे ३०० हून अधिक प्रवासी होते. घटनेनंतर या डेमो रेल्वे गाडीतील प्रवाशांना सातारा - पंढरपूर रेल्वेने मार्गस्थ करण्यात आले.
पुण्याहून कोल्हापूरकडे रेल्वे डेमो प्रवासी गाडी निघाली होती. प्रवासी पॅसेंजर गाडीतील (क्र. ११४२५) इंजिनजवळील ॲक्सल बॉक्सला आग लागल्याचे डेमो रेल्वेचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने स्थानक प्रमुखांशी तात्काळ संपर्क साधत आगीबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी रेल्वे स्थानकातील १४ अग्निशमन यंत्रांद्वारे आग विझविण्यात यश आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. दरम्यान, कराड पालिकेचा अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले. चालकाच्या प्रसंगावधान व तत्परतेने आग विझविण्यास मदत झाली.
या घटनेनंतर मिरजेहून रेल्वेचे सीएनडब्ल्यू पथक घटनास्थळी सायंकाळी पाहणीसाठी आले होते. आग निश्चित कशामुळे लागली?, या कारणाचा शोध घेतला जात आहे. मात्र त्याचवेळी कराडमध्ये सातारा-मिरज-पंढरपूर गाडी दाखल झाली होती, ती परतीच्या प्रवासासाठी साताऱ्यातून पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी कराड रेल्वे स्थानकावर आली होती. त्या गाडीतून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडीतील प्रवाशांना मिरजेकडे रवाना करण्यात आले.
दरम्यान,कराड रेल्वे स्थानकातील आरपीएफ पोलीस अधिकारी एस. एन. रेड्डी, पोलीस ए. के. घाडगे, जी. बी. संदीप, अमर देशमुख, मुकुंद डुबल, रेल्वेस्थानक प्रमुख ॲलेक्झांडर व त्यांचे सहकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडीतील प्रवाशांना सुखरूप खाली उतरून घेत पुढील प्रवासासाठी रवाना करण्यास मदत केली.