वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार

वाघोलीत एका शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार
Published on

पुणे : वाघोलीत एका शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली आहेत.

याबाबत निलेश सुभाष सातव (३३) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव शेतकरी आहेत. त्यांचा बंगला वडजाई वस्ती परिसरात आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास सातव यांच्या बंगल्याच्या खिडकीवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात खिडकीच्या काचा फुटल्या. गाढ झोपेत असलेले सातव कुटुंबीय गोळीबाराच्या आवाजामुळे जागे झाले. त्यांनी पाहणी केली. तेव्हा खिडकीच्या काचा फुटल्याचे लक्षात आले. तेव्हा घरात दोन पुंगळ्या सापडल्या.

सातव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

सातव यांच्या बंगल्याच्या खिडकीतून दोन गोळ्या झाडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर सातव यांची चौकशी करण्यात आली. सातव यांचा कोणाशी वाद नव्हता. गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

logo
marathi.freepressjournal.in