गोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला; चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर कार्यालयात घुसून गोळीबार

भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुण हे तोंडाला रुमाल बांधून आले. या पाचही आरोपींच्या हातात पिस्तूल होती. कारमधून उतरताच ते...
गोळीबाराने महाराष्ट्र पुन्हा हादरला; चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर कार्यालयात घुसून गोळीबार

कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असताना राज्यात आणखी एका ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जळगावमधील चाळीसगाव येथे आज दुपारच्या सुमारास भाजपच्या एका माजी नगरसेवकावर जिवघेणा हल्ला झाला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तोंडावर रुमाल बांधून आलेल्या पाच तरुणांनी गोळीबार केला आहे. यात मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुण हे तोंडाला रुमाल बांधून आले. या पाचही आरोपींच्या हातात पिस्तूल होती. कारमधून उतरताच ते माजी नगरसेवक मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर त्यांनी तेथून पळ काढला. ही घटना पूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कशा प्रकारे माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेऊन आले. योग्य संधी साधत ते मोरे यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी मोरेंवर गोळीबार केला आणि तेथून धूम ठोकली. या गोळीबारात बाळू मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु-

या घटनेची माहिती मिळताच चाळीगाव शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची तसेच सीसीटीव्हीची पाहणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. या अज्ञात तरुणांनी माजी नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार का केला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in