
छत्रपती संभाजीनगर : मार्च महिना सर्वाधिक उष्णतेचा असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण रात्री गारवा आणि दुपारी घामटा, असे चित्र राज्यात दिसत होते. पण आता बहुतांश शहरांतील तापमान दिवसेंदिवस वाढू लागले असून राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात एका २५ वर्षीय युवकाला उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस पारा वाढतच चालला आहे. सोयगाव तालुक्यात मंगळवारी ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अमोल दामोदर बावस्कर नावाचा तरुण निमखेडी बसथांब्यावर उन्हात थांबला होता. बसथांब्यावरच तो कोसळला, त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मार्च महिना शेवटच्या टप्प्यावर असतानाच उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात हवामान विभागाने एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील तापमानात वाढ होत असली तरी काही भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. मंगळवारी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तसेच साताऱ्यातील कराडमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतमालाचे मात्र नुकसान झाले आहे.
शनिवारपासून मुंबई तापणार
शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मुंबईत कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस असले तरी शनिवारनंतर त्यात तीन ते चार अंशांनी वाढ होणार आहे. १ ते ६ एप्रिलदरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील काही भागांत मान्सूनपूर्व हलक्या पावसाची शक्यता आहे.
सांगलीत वीज पडून महिलेचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एका शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. सकाळी शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या शेतातील कामे उरकून घरी परतत असताना, अंगावर वीज पडून मृत्यू पावल्या. यावेळी शेजारी असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.