

हारून शेख/लासलगाव
नाशिक जिल्ह्यात सध्या मक्याची विक्रमी आवक होत असून, लासलगाव बाजार समितीत दररोज ८ ते ९ हजार क्विंटल मका येत आहे. वाढत्या आवकेमुळे या हंगामातील पहिला मका रेल्वे रॅक पंजाबकडे रवाना झाला. एकूण २६८५ टन मका, ४२ डब्यांच्या रॅकद्वारे लासलगावहून निघून १६०० किलोमीटरचा प्रवास करत ५ दिवसात पगवाडा (पंजाब) येथे पोहोचणार आहे.
मका व्यापाऱ्यांच्या मते, रेल्वेद्वारे वाहतूक केल्याने वेळेची बचत, वाहतूक खर्चात घट होणार असून, मोठ्या प्रमाणातील माल देशभर पाठविणे अधिक सुलभ झाले आहे.
मका रेल्वेद्वारे पाठविण्याच्या प्रक्रियेमुळे १३० मालट्रक चालक आणि ३५० पेक्षा जास्त कामगारांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. रेल्वेलाही या रॅकमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. पंजाबमध्ये कुक्कुटपालन उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे पशुखाद्यासाठी मक्याची मोठी मागणी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात यंदा मका उत्पादन जास्त असल्याने पंजाबमधील उद्योगांनी लासलगाव, विंचूर येथील व्यापाऱ्यांकडून मक्याची मागणी केली आहे.
लासलगाव व विंचूर येथील सात व्यापाऱ्यांनी एकत्रित २६०० टन मका पंजाबकडे रवाना केला असून, हा या हंगामातील पहिला रेल्वे रॅक ठरला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात मक्याची आवक सुरू असून, हंगामातील पहिला रॅक पंजाबला रवाना झाला आहे. आगामी दिवसांत आणखी रॅक पाठविण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर गांगुर्डे, मका व्यापारी, लासलगाव
जिल्ह्यात बंपर उत्पादन
यंदा सात महिन्यांपर्यंत पाऊस सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी मका उत्पादनाकडे कल वाढवला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जास्त उत्पादन होऊन सर्व बाजार समित्यांमध्ये भरघोस आवक सुरू आहे. सध्या मक्याला प्रति क्विंटल १५०० ते १६०० रुपये दर मिळत आहे.