
मुंबई : सध्या बालवाडीतून उच्च शिक्षणापर्यंत इंग्रजीतून शिक्षण घेण्याचा वारू चौफेर उधळलेला आहे. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास आपले मूल मागे पडेल, असे पालकांना वाटते. पण, मराठीतून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारी पहिली तुकडी रविवारी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. या तुकडीमुळे लाखो मराठी बांधवांना मराठीतून अभियांत्रिकी शिक्षणाची कवाडे उघडी झाली आहेत.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना ‘एआयसीटीई’चे माजी अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, ‘एआयसीटीई’ने २०२१ मध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. चार वर्षांत हा उपक्रम १० राज्यांतील ६ भारतीय भाषांमध्ये २४ महाविद्यालयांनी स्वीकारला. या उपक्रमावर शिक्षणतज्ज्ञ व माध्यमांनी अनेक शंका उपस्थित केल्या. मातृभाषेतून शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील का? ते जीवनात यशस्वी होतील का? पण, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने संगणक अभियांत्रिकीचा पूर्ण विभाग मराठीतून सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मराठीतून संगणक अभियांत्रिकी शिकलेली ६७ विद्यार्थ्यांची तुकडी नुकतीच पदवीधर झाली. त्यांचा ‘अश्वमेध’ पदवी वितरण समारंभ नुकताच पार पडला.
‘अश्वमेध’ हे नावच मुळी प्रेरणादायक आहे. हे ६७ योद्धे आपले तंत्रज्ञान कौशल्य वापरून जग जिंकणार आहेत. गडचिरोली, धुळे, बीड, जळगाव, जालना, लातूर, अमरावती, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थी या पहिल्या तुकडीत होते.
या अभ्यासक्रमासाठी डॉ. गोविंद कुलकर्णी - संचालक, पीसीसीओई, डॉ. रचना पाटील - मराठी संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख, डॉ. राहुल कुलकर्णी - ‘डीओएनईडब्ल्यू’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आदींनी संपूर्ण पाठबळ दिले.
ऑस्ट्रेलियात मिळवले उपविजेतेपद
या तुकडीतील विद्यार्थी अभिषेक भोसले, गौरव महाले आणि मोहिनी मेहता यांच्या पथकाने ऑस्ट्रेलियातील ‘टेक्नॉलॉजी इन्फ्युजन ग्रँड चॅलेंज’मध्ये १७४ पथकांमध्ये पहिले उपविजेतेपद जिंकले.
७० टक्के विद्यार्थ्यांना चांगले पॅकेज
मातृभाषेतून शिकलेल्या या अभियंत्यांना इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त म्हणजे ७०% विद्यार्थ्यांना टेक महिंद्रा, एचपी, ॲॅसेंचर, केपजेमिनी, एलटीआय माइंड ट्री आदी कंपन्यांमध्ये वार्षिक ३.५ ते १० लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे.