पंढरपूरकरांच्या सेवेत सुसज्ज रुग्णालय, जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार; पंढरपूरमध्ये पहिले एक हजार बेड्सचे रुग्णालय

जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी करत पंढरपूरकरांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पंढरपुरात भव्य एक हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
पंढरपूरकरांच्या सेवेत सुसज्ज रुग्णालय
पंढरपूरकरांच्या सेवेत सुसज्ज रुग्णालय
Published on

मुंबई : आषाढी कार्तिकी चैत्री, माघ या चार वारीत पंढरपूरमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तर पंढरपूर तीर्थक्षेत्र हे महामार्गाला जोडल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. असे असताना पंढरपूर व महामार्गावर अपघात अथवा कोणाला उपचाराची गरज भासल्यास जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी करत पंढरपूरकरांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पंढरपुरात भव्य एक हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ या चार वारीत दाखल होणारे लाखो वारकरी तसेच दैनंदिन वाढत असलेल्या रुग्णांची मोठी संख्या पाहता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सर्व सुविधांयुक्त सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष बाब म्हणून यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

पंढरपुरात सध्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, वर्षभरात येथे भरणाऱ्या प्रमुख चार वारीच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होतात. यासह विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविकांची वर्दळ असते. पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेल्याने बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे येत असतात. या सर्वांचा मोठा ताण उपजिल्हा रुग्णालयावर पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नाइलाजास्तव तसेच अनेकांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घेण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर नुकतेच आषाढी यात्रा कालावधीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता तसेच आरोग्य सेवेवर पडणारा ताण याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ येथे १ हजार खाटांचे सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते.

५ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक यांनी पंढरपूर येथे १ हजार खाटांचे सामान्य रुग्णालय उभारणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यात विशेष बाब म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने तत्काळ मान्यता दिली असून शासन निर्णयही गुरुवारी जारी करण्यात आला आहे.

अशी बेड्सची सुविधा

नवनिर्मित १ हजार बेड्सच्या या रुग्णालयात सामान्य रुग्णालय ३०० बेड्स, महिला व शिशु रुग्णालय ३०० बेड्स, ऑर्थोपेडिक व ट्रामा केअर रुग्णालय १५० बेड्स, सर्जरी रुग्णालय १०० बेड्स, मेडिसीन अतिदक्षतांसाठी १०० बेड्स व मनोरुग्णालयासाठी ५० बेड्स अशी रचना असणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम व पदनिर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे या निर्णयात नमूद करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यास सूचित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in