कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; आधीच्या सरकारकडून प्रकल्पात केवळ अडथळेच, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

कोस्टल रोड प्रकल्पात मोक्याच्या ठिकाणी जागेचा शोध घेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; आधीच्या सरकारकडून प्रकल्पात केवळ अडथळेच, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय लाटणाऱ्यांनी या प्रकल्पात अनेक अडथळे आणले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाला वेग आला आणि एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. कोस्टल रोड प्रकल्पात मोक्याच्या ठिकाणी जागेचा शोध घेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक मार्गिका अंशतः वाहतुकीसाठी खुली करण्यास मुख्यमंत्र्यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर, उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, किरण पावसकर, आमदार राजहंस सिंह, सदा सरवणकर, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त व कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रमुख अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आदी उपस्थित होते.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकदरम्यान १०.५८ किलोमीटर कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्यात आली असून संपूर्ण कोस्टल रोड मे अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येईल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईपर्यंत न थांबता प्रियदर्शनी पार्क ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात असून वांद्रे ते वर्सोवा, वर्सोवा-दहिसर-भाईंदरदरम्यान ५३ किलोमीटरचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे मुंबईचा प्रवास वेगवान होणार असून भाईंदर ते दक्षिण मुंबईतील प्रवास एक तासात होणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. कोस्टल रोड प्रकल्पात आधीच्या सरकारने खोडा घालण्याचा खूप प्रयत्न केला. एमएमआरडीए, एमएसआरडीएच्या माध्यमातून कोस्टल रोडचे काम झाले असते. परंतु, कोस्टल रोड मुंबई महापालिकेनेच करावा, असा हट्ट आधीच्या सरकारने का धरला हे मी सांगायला नको, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मुंबई-विरार-अलिबाग -अटल सेतूवरून पुन्हा मुंबईत

मरीन ड्राईव्ह ते वरळी, वरळी सी लिंक ते वर्सोवा-दहिसर आणि दहिसर ते भाईंदर आणि भाईंदर ते विरार आणि विरारपासून पालघर ते थेट अलिबागपर्यंत रिंग रोंड तयार करण्यात येणार आहे. अलिबागला हा मार्ग अटल सेतूला जोडला जाईल. यामुळे मुंबई आणि महानगर क्षेत्र एका मार्गाने जोडले जाणार आहे. यामुळे मुंबई ते रायगड एक तासात जाता येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिराला ५०० कोटी

- मुंबईसह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर आणि परिसराचा विकास उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करण्यात येईल. यासाठी पालिकेमार्फत ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईसाठी कोस्टल रोड टोलमुक्त -अजित पवार

मी आतापर्यंत अनेक सरकारमध्ये कामे केली, परंतु आताचे सरकार गतिमान सरकार आहे. कोस्टल रोड प्रकल्प तडीस नेला. कोस्टल रोड प्रकल्प मुंबईसाठी असून मुंबईकरांचा प्रवास टोलमुक्त असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in