आता जंगलाबाहेर प्रथमच कॅमेऱ्याने करणार ट्रॅप; वनविभाग करणार सर्वेक्षण, उसाचा मळा, केळीच्या बागेत बिबट्याचा शोध

आता जंगलाबाहेर प्रथमच उसाचे मळे, केळीची बाग आणि कापसाच्या शेतीत बिबट्यांचा शोध घेण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या वन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
आता जंगलाबाहेर प्रथमच कॅमेऱ्याने करणार ट्रॅप; वनविभाग करणार सर्वेक्षण, उसाचा मळा, केळीच्या बागेत बिबट्याचा शोध
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

बिबट्यांची पैदास झपाट्याने वाढत असून उसाचे मळे, केळीची बाग आणि कापसाच्या शेतीत बिबट्यांचे आश्रयस्थान बनले आहे. याठिकाणी बिबटे ८ ते ९ महिने वास्तव्य करतात. दिवसभर याठिकाणी बिबटे लपून बसतात आणि रात्रीनंतर ते बाहेर पडतात. त्यामुळे आता जंगलाबाहेर प्रथमच उसाचे मळे, केळीची बाग आणि कापसाच्या शेतीत बिबट्यांचा शोध घेण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या वन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या काही वर्षांत राज्यात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला असून माणसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्यांची पैदास वाढल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जंगलात असणाऱ्या बिबट्यांना ट्रॅक करण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे जंगलात किती बिबटे आहेत, याची माहिती वनविभागाकडे उपलब्ध असते. मात्र राज्यात उस, कापसाची शेती आणि केळीच्या बागेत बिबटे असल्याची नोंद वनविभागाकडे नाही. राज्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बिबट्यांची अचूक माहिती अथवा संख्या उपलब्ध असणे गरजेचे आहे. २०२२ मध्ये वनविभागाने केलेल्या जनगणने राज्यात एकूण २,२८५ बिबटे आढळले होते. आता पुढील वर्षी २०२६ मध्ये गणना करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलांपेक्षा शेत पिकांमध्येच बिबट्यांची पैदास वाढली आहे. त्यामुळे आता जंगलाबाहेर बिबट्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी पहिल्यांदाच जंगलाबाहेर कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

कॅमेरा चोरीला जाण्याची भीती!

वास्तविक जंगलाबाहेर किंवा नागरी वस्तीत कॅमेरे लावणे जोखमीचे आहे. कॅमेरे गहाळ होणे किंवा चोरीला जाणे जाणूनबुजून खराब करणे अशा घटना घडू शकतात. मात्र, बिबट्यांची अचूक संख्या जर प्राप्त करायची असेल तर याशिवाय पर्याय नसल्याने आता मानवी वस्तीतही अशा पद्धतीचे कॅमेरे लावले जाणार आहेत.

ऊस पट्ट्यात विशेष पैदास

पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे पीक बारमाही असल्याने उसाच्या शेतात राहण्यासाठी आणि लपण्यासाठी बिबट्यांना जागा उपलब्ध होते. त्यामुळे उसाच्या शेतातच आता मोठ्या प्रमाणात बिबट्यांची पैदास होऊ लागली आहे. उसाच्या पट्ट्यात सुमारे दोन हजार बिबट्यांचा वावर वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in