मुंबई : गेली पाच ते सहा वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झाला असून तब्बल ९ वर्षांनी ऑगस्ट-२०२४ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले आहे.
दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यापाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय, अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.
याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान", विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याचबरोबर नादुरुस्त बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्म्याने कमी करण्यात आले. ते १२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करून डिझेलची बचत करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख, ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे.
या कामगिरीबद्दल उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.
भविष्यात येऊ घातलेल्या स्वमालकीच्या बसेस व भाडेतत्त्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करून एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतिशील आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. जेणेकरून एसटीला गतवैभव प्राप्त होईल.
- डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ