कोयना नदीत मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला २५ किलोंचा 'कटला', ग्राहकांची उडाली झुंबड

कोयना नदीच्या डोहात तब्बल २५ किलोचा कटला मासा अडकल्याने हा मासा पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
कोयना नदीत मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला २५ किलोंचा 'कटला', ग्राहकांची उडाली झुंबड
Published on

कराड : सध्या पावसाने अधूनमधून का होईना, पण कधी तुरळक, तर कधी धुवांधार स्वरूपात हजेरी लावल्याने येथील बहुतेक सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यामुळे कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुठे नदीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे तर कुठे वाढली आहे. परिणामी, अनेक महिन्यांनी मच्छिमारांना नदीत मासे सापडत आहेत. शनिवारी तांबवे, ता. कराड येथील एका मच्छिमाराच्या जाळ्यात कोयना नदीच्या डोहात तब्बल २५ किलोचा कटला मासा अडकल्याने हा मासा पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.

संपूर्ण उन्हाळ्यात कोयना धरणातून पाणी सोडणे सुरू होते. तसेच टेंभू योजना, नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. पाण्याच्या फुगवट्यामुळे कोयना नदीपात्र तुडुंब होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मासे सापडत नव्हते. पावसाळ्याच्या सुरुवातीला बंधाऱ्यांच्या फळ्या काढून पाणी सोडून देण्यात आल्यामुळे सध्या काही ठिकाणी नदीची पाणीपातळी कमालीची खालावली आहे, तर काही ठिकाणी पाणी सोडल्यामुळे वाढली आहे. तसेच काही ठिकाणी डोह तयार झाल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामध्ये सध्या मासे सापडू लागले आहेत. त्यामुळे मच्छीमारांना नदीमध्ये मोठे मासे सापडत आहेत.

२०० रु. किलो दराने ग्राहकांनी केली खरेदी

तांबवे येथील मच्छीमार हजरत पठाण याने शुक्रवारी रात्रीच कोयना नदीच्या डोहात मासे पकडण्याचे जाळे टाकले होते. शनिवारी सकाळी एका जाळ्यात भलामोठा कटला मासा अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अन्य मच्छीमारांच्या मदतीने तो मासा आपल्या घरी आणला असता हा मासा पाहणाऱ्यांची, तर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळातच ग्राहकांनी हा मासा २०० रुपये किलो दराने खरेदी केला.

logo
marathi.freepressjournal.in