

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले ५ पर्यटक समुद्रात बुडाले. पाच दुर्दैवी पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते.
हे सर्व पर्यटक बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील होते. ते सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काही जण समुद्रात पोहायला उतरले. मात्र, पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण पाण्यात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या पाचजणांमध्ये अदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडु हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दिपक आदमाने (१९), यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सागितले.