शिर्डी विमानतळाजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नाशिक येथे कुंभमेळा पार पडणार असून कुंभमेळ्यात १५ कोटींहून अधिक भक्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांसाठी शिर्डी विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेल उपलब्ध करा, शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : नाशिक येथे कुंभमेळा पार पडणार असून कुंभमेळ्यात १५ कोटींहून अधिक भक्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांसाठी शिर्डी विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेल उपलब्ध करा, शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची ९२ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानतळाच्या तुलनेत कमी ठेवण्यात यावेत. शिर्डीचे महत्त्व आणि आगामी काळात येथे येणाऱ्या भाविकांची वाढणारी संख्या विचारात घेता विमानतळजवळ पंचतारांकित हॉटेलची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी जागा सुनिश्चित करून नामांकित हॉटेल्स कंपन्यांना येथे निमंत्रित करावे. यवतमाळ येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मिहानमध्ये २२३ एकर जमीन

सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (एसडीएएल) या देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्प्लोजिव व इनिशिएटिंग सिस्टीम्स उत्पादक व निर्यातदार कंपनीला मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील २२३ एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. एसडीएएलने डावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाशी याबाबतचा सामंजस्य करार केला होता. या करारानुसार कंपनी नागपूरमध्ये ‘अँकर मेगा डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्प’ उभारणार असून, यामध्ये १२,७८० कोटी रुपयांची गुंतवणूक व सुमारे ६,८२५ थेट रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in