सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणार डरकाळी

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांत व्याप्ती असलेल्या येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्याने पाच वाघिणी आणल्या जाणार आहेत.
सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणार डरकाळी
Published on

रामभाऊ जगताप/कराड

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांत व्याप्ती असलेल्या येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्याने पाच वाघिणी आणल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली विभागाने तयार केला असून, ताडोबा येथून पाच वाघिणी आणल्या जाणार आहेत. याशिवाय बार्शीत फिरत असलेला वाघ (नर) पकडून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्याचे आदेश वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाघिणी आल्यानंतर कर्नाटक ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असा नर वाघांचा प्रवास नैसर्गिकरीत्या थांबणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष असून, पाच वाघिणींची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार आहे.

मागील वर्षी २४ ऑक्टोबरला चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळी एका वाघाचे (नर) छायाचित्र टिपण्यात आले होते. सन २०१८ साली आलेल्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-१’ असे केले होते; तर गतवर्षी आढळलेल्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-२’ असे करण्यात आले आहे. पावसाळ्यात साधारणत: १०० किलोमीटरचे अंतर कापून हे वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत. हे दोन्ही वाघ अनेकदा ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षांत सह्याद्रीच्या दक्षिणेस असलेल्या तिलारी ते राधानगरी असे अंतर कापून हे दोन्ही वाघ मादीच्या शोधात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली अभयारण्यात दाखल झाल्याचे आणि आता याच ठिकाणी वारंवार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय बार्शीत फिरत असलेला वाघ (नर) पकडून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्याचे आदेश वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून झाले आहेत.

दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणण्याचा प्रस्ताव सन २०२३ मध्ये केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच ताडोबा अभयारण्यातील ५ वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणल्या जाणार आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाघिणी आल्यानंतर कर्नाटक ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांचा (नर) प्रवास नैसर्गिकरीत्या थांबणार आहे.

नर वाघांचे स्थलांतर थांबणार

वाघिणींचे आगमन होताच कर्नाटकच्या दिशेने वाघांचे (नर) होणारे स्थलांतर थांबणार आहे. या व्याघ्र प्रकल्पात चितळ, रानडुक्कर, सांबर यांची मुबलक संख्या आहे. या परिस्थितीमध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून इतर व्याघ्र प्रकल्पांतून ८ वाघ या प्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्वीचे दोन आणि बार्शीतून आणण्यात येणारा एक असे एकूण ३ वाघ (नर) प्रकल्पात असतील. यानंतर आता पाच वाघिणी आणण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in