
पंढरपूर : सांगोला तालुक्यात पंढरपूर-कराड मार्गावर भरधाव ट्रकने सात महिलांना चिरडल्याचा प्रकार मंगळवारी घडला. या भीषण अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील बंडगरवाडी येथे एका ट्रकने चिरडले. या सर्व महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या आहेत. शेतातील कामे आटोपून घरी माघारी जात असताना हा अपघात झाला. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. या सात महिला शेतीचे काम करून घरी परतण्यासाठी गाडीची वाट पाहत बसल्या होत्या. त्याचवेळी कोळसा घेऊन जाणारा एक ट्रक या महिलांच्या थेट अंगावर गेला. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
अपघातस्थळी पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, दाखल झाले असून, ग्रामस्थांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.