जळगाव जिल्ह्यातील तापी, वाघूर नद्यांना पूर; हतनूर धरणाचे २४ गेट उघडले, पुरात दोन जण बुडाले

जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे तापी, वाघूर, गिरणा आणि अन्य नद्यांना पूर आले असून जळगावातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील तापी, वाघूर नद्यांना पूर;  हतनूर धरणाचे २४ गेट उघडले, पुरात दोन जण बुडाले
Published on

जळगाव : जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून या पावसामुळे तापी, वाघूर, गिरणा आणि अन्य नद्यांना पूर आले असून जळगावातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तापीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे २४ गेट पूर्णपणे उघडले असून त्यातून एक लाख १९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे तर वाघूर धरण ९७ टक्के भरले असून वाघूर नदीला आलेल्या पुराचा जामनेर तालुक्यातील चार गावांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पुरामध्ये जामनेर व बोदवड तालुक्यातील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी या गावांना भेटी दिल्या असून याप्रकरणी मदतकार्य मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा डोगररांगात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाकोद, पहूरपेठ, हिवरीदिगर, पिंपळगाव या चार गावांना पुराचा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील शहापूर येथील एक जण खडकी नदीच्या पुरात वाहून गेला. तसेच बोदवड येथे हरणखेड तलावात एक जण वाहून गेल्याचे समोर आले आहे.

जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली

पुरामुळे बाधित झालेल्या गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी टंकीत, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली व मदतकार्य वाढवण्याच्या सूचना केल्या. वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ९७ टक्के भरले असल्याने जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची मिटली आहे.

logo
marathi.freepressjournal.in