
मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार, हत्या, आर्थिक गैरव्यवहार आदी प्रश्न १० मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात मांडता आले नाही तर सेना आमदारांच्या माध्यमातून राज्याच्या अधिवेशनात मांडले जातील. तुमच्या मतदार संघातील प्रश्न संबंधित आमदारांकडे द्या, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शनिवारी खासदारांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्याचे शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.
सोमवार, ३ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तर १० मार्चपासून संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे.
संसदीय अधिवेशनात राज्यातील प्रश्न मांडण्यासाठी अधिकचा वेळ मिळत नाही. त्यामुळे राज्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील प्रश्न स्थानिक आमदारांना सांगा. सेना आमदार राज्याच्या अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडत त्या प्रश्नाचे वेळीच निवारण करण्याचा प्रयत्न करतील, असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे संजय दिना पाटील यांनी सांगितले.
राज्यातील अधिवेशनात जनतेचे प्रश्न कोण मांडणार, कुठल्या विषयांत कुठल्या आमदाराला अधिकची माहिती, अशा आमदारांकडे आपल्या मतदार संघातील प्रश्नांचे लेखी निवेदन द्या, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांना केल्या.