छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र सदनप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीदेखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती.
छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र सदनप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी

नवी दिल्ली : नाशिक लोकसभेची तयारी करणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या मुक्ततेला आव्हान देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश दिले असून सोमवारी याबाबत हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

अंजली दमानिया यांनी याबाबत ‘एक्स’वर म्हटलेय की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आले होते. या प्रकरणातील मुक्ततेला आव्हान देणारे अपील गेले दीड वर्ष प्रलंबित होते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयासमोर एक याचिका करून योग्य न्यायाधीशांसमोर त्याची नोंदणी करण्याचे आदेश मिळाले आहेत. शेवटी प्रकरण अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदन कथित घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांची यापूर्वी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीदेखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती.

अंजली दमानियांचे क्लीनचिटला आव्हान

भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका केली होती. आता या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. छगन भुजबळांना मिळालेली क्लीनचिट कायम राहणार की न्यायालय पुन्हा शिक्षा सुनावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in