
नाशिक : शहराच्या पंचवटीतील फुलेनगर भागात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात निष्पन्न झाले आहे की, जुन्या वादातून सागर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यात पाटील यांचा सहभाग होता.
विशेष म्हणजे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये उपस्थित असतानाच ही अटकेची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोधही सुरु आहे. याआधीच या प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाचा तपशीलगेल्या आठवड्यात पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर जाधव नावाच्या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला असून त्याला दोन गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी तपास करत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता भाजपचा दुसरा माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणात अडकल्याने शहरभर चर्चा सुरू आहे.