कोकणचे सुपुत्र, शिवसैनिकांचे 'सर', निष्ठावंतांचा सुसंस्कृत 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचे निधन

लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, तमाम शिवसैनिकांचे 'सर' आणि मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर, हा आपल्या राजकीय प्रवासातील स्वल्पविराम आहे, असे मोकळेपणाने सांगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले.
कोकणचे सुपुत्र, शिवसैनिकांचे 'सर', निष्ठावंतांचा सुसंस्कृत 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचे निधन
Published on

मुंबई : लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, तमाम शिवसैनिकांचे 'सर' आणि मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर, हा आपल्या राजकीय प्रवासातील स्वल्पविराम आहे, असे मोकळेपणाने सांगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना बुधवारी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक पुत्र, दोन कन्या, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

राज्यात प्रथमच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर १९९५ ते १९९९ या कालावधीत मनोहर जोशी हे अविभक्त शिवसेना-भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने मे महिन्यात जोशी यांना रुग्णालयात दाखल केले होते.

मुंबई महापालिकेत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मनोहर जोशी यांनी त्यानंतर आपल्या राजकीय प्रवासात मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी त्यांच्या जीवनप्रवासाची चढती भाजणी होती. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना मनोहर जोशी हे २००२ ते २००४ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते. राज्यातील प्रत्येक प्रमुख एसटी आगारासमोर 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट'चे जाळे आपण विणले आहे, असे वाजपेयी यांनी जोशी यांचे अभिनंदन करताना म्हटले होते, त्याला सर्व सभागृहासमवेतच जोशी यांनीही खळखळून हसून दाद दिली होती. मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीजेटीआय) नागरी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या जोशी यांनी त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि १९८० च्या दशकात ते पक्षातील अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले. जोशी यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि १९६७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९७६-७७ या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. त्यानंतर विधान परिषद आणि विधानसभेवर ते निवडून आले. देशात १९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अवजड उद्योग खात्याची धुरा सोपविण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in