महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री ३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी (दि. 21 फेब्रुवारी) त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती.

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवारी दुपारनंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठेवण्यात येईल असे समजते.

‘शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणून जगलेले, मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!’  अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजकीय कारकीर्द-

प्रकृती आणि वयामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला होता. १९९५रोजी ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी अनेक पदे यशस्वीपणे सांभाळली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in