Video : अशोक चव्हाण चुकले, भाजपऐवजी "मुंबई कॉंग्रेस..." म्हणाले अन् सगळेच खळखळून हसले

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी भाजप म्हणण्याऐवजी सवयीप्रमाणे चुकून काँग्रेस असा उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Video : अशोक चव्हाण चुकले, भाजपऐवजी "मुंबई कॉंग्रेस..." म्हणाले अन् सगळेच खळखळून हसले

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा अखेर आज भाजप प्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी भाजप म्हणण्याऐवजी सवयीप्रमाणे चुकून काँग्रेस असा उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं....

सर्वप्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांना भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन चव्हाण यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. मग पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी चव्हाण यांच्या हाती माईक आला. त्यांनी सुरूवात बरोबर केली. पहिले त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. नंतर, बावनकुळेंचा उल्लेख करताना 'महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष बावनकुळेजी' हे देखील बरोबर म्हटले. पण नंतर त्यांच्याकडून गोंधळ झाला.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा उल्लेख करताना चुकून अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असे म्हणाले आणि लगेचच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लगेच फडणवीसांनी हसतच चूक निदर्शनास आणून देत 'मुंबई भाजप'चे असा बदल सुचवला. यावेळी चव्हाणांनाही हसू अनावर झाले होते. हास्यकल्लोळ सुरू असताना, 'हा सवयीचा परिणाम आहे' असे चव्हाण म्हणाले, तर '५० वर्षांच्या सवयीचा परिणाम' असल्याचे फडणवीस पुढे म्हणाले. मग, 'पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात आहे, आज पहिलाच दिवस आहे' असे म्हणत चव्हाणांनी सारवासारव केली व अखेरीस 'मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार' असा बरोबर उल्लेख केला. दरम्यान, यावेळी फडणवीस, चव्हाण, बावनकुळे यांच्यासह उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य आले होते.

दरम्यान, चव्हाण यांच्यासोबत नांदेडचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी, पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पक्ष वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे पक्षाने मला भरपूर दिले तरी पक्ष सोडला अशी टीका करणे योग्य नाही. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in