
गोंदिया : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचे सोमवारी येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे.
महादेव शिवणकर यांनी सोमवारी सकाळी आमगाव येथील राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. आमगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केले होते. तर लोकसभेत त्यांनी चिमूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. शिवणकर भाजपच्या शेतकरी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
भंडारा आणि गोंदियाच्या विभाजनाची घोषणा त्यांनी २६ जानेवारी १९९९ रोजी केली होती. त्यांनी राज्याचे पाटबंधारे आणि अर्थमंत्रीपद भूषविले होते. आमगावमधील साखरीतला घाटावर त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पूर्व विदर्भात भाजपच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे असल्याचे सांगून फडणवीस यांनी त्यांना ‘एक्स’वर पोस्ट करीत श्रद्धांजली अर्पण केली.