Gangadhar Gade: गंगाधर गाडे यांचे निधन

माजी परिवहन राज्यमंत्री आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर सुखदेव गाडे (वय ७६) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.
Gangadhar Gade: गंगाधर गाडे यांचे निधन
X

संभाजी नगर : माजी परिवहन राज्यमंत्री आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर सुखदेव गाडे (वय ७६) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पीरबाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (५ मे) सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धात, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारतीय दलित पँथरचे आधारवड आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. विद्यापीठ नामांतर आंदोलनात गाडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळात गाडे परिवहन राज्यमंत्री होते. विद्यार्थी चळवळीतून गाडे यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. मिलिंद महाविद्यालयात शिकताना आंबेडकरी चळवळीत त्यांची वैचारिक जडणघडण झाली होती. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर त्यांनी ‘रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन’द्वारे आक्रमक आंदोलन केले होते. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली गाडे यांनी भारतीय दलित पँथरची पुनर्स्थापना केली होती. कवठाळ (जि. अमरावती) येथून आलेल्या गाडे यांनी मराठवाड्यातील दलित चळवळीला दिशा दिली होती. पँथर पॉवर कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे संघटन उभारले होते. शिक्षण संस्था आणि सामाजिक उपक्रमातून गंगाधर गाडे यांनी वंचित वर्गासाठी भरीव काम केले. अभ्यासू नेते आणि फर्डे वक्ते अशी गाडे यांची ख्याती होती.

दरम्यान, गाडे यांचे पार्थिव पीरबाजार येथील नागसेन विद्यालयात रविवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यापीठ गेट येथे अंत्यदर्शन घेण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in