
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी पालिका भूखंड आणि पंचतारांकित हॉटेलचा समावेश असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी वायकर यांना समन्स बजावण्यात आलं होते. त्यानुसार रविंद्र वायकर सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले.
वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेकडून बागेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाची मंजुरी मिळवल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे त्यांनी पालिकेचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. संबंधित प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वीच पालिकेच्या उद्यान आणि इमारत प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने हॉटेलला बेकायदा मान्यता दिल्याचा आरोप आहे.
रवींद्र वायकर यांनी यापूर्वी सर्व आरोप खोटे व निराधार आहेत असं म्हटलं होतं. माझ्याकडे भूखंडाची सर्व कायदेशीर कागदपत्रं असून कोणत्याही नियमाचं किंवा कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याची माहिती रविंद्र वायकर यांनी दिली आहे. यामुळे दसरा मेळाव्याआधीचं माजी मंत्री रविंद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला भेटं द्यावी लागली आहे.