माजी आमदार दिगंबर विशे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुरबाड विधानसभा मतदारसंघात युतीचे पहिले उमेदवार म्हणून निवडून आले होते
माजी आमदार दिगंबर विशे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुरबाड : कुणबी समाजाचे अभ्यासू नेतृत्व भाजपचे माजी आमदार दिगंबर विशे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मुरबाड मतदार संघासह ठाणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दहीहंडीची धामधुम सुरू असताना माजी आमदार दिगंबर विशे यांचे निधन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

न्यू. इंग्लिश स्कूल शाळा, मुरबाड येथे प्राध्यापक असताना त्यांना १९९५ ला भाजप-शिवसेना युतीने उमेदवारी दिली होती. त्यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघात युतीचे पहिले उमेदवार म्हणून निवडून आले होते. भाजपचा अभ्यासू हुशार तरुण चेहरा म्हणून त्यांच्यावर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले आहे. माजी आमदार दिगंबर विशे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

युतीच्या शासनाच्या काळात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांनी ठाणे जिल्ह्यात रुन्दे, गुरवली, वासुंद्री, धानिवलीसह अनेक नवीन पूल, नवीन रस्ते निर्माण केले आहेत. मुरबाड तालुक्यात त्यांनी आश्रमशाळा काढून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा पाया रचला. मुरबाड-कुडवली येथे कृषी कॉलेज काढले तसेच शिक्षकांच्या अनेक समस्या सरकार दरबारी सोडवल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in