सोलापुरात तरुण उमेदवारांमुळे चुरस; नरसय्या आडम यांची प्रणिती शिंदे यांना साथ मिळणार

प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनीच आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच खुद्द प्रणिती शिंदे यांचे नेटवर्क जिल्ह्यात आहे. तसेच त्यांच्यामागे तरुण आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आहे.
सोलापुरात तरुण उमेदवारांमुळे चुरस; नरसय्या आडम यांची प्रणिती शिंदे यांना साथ मिळणार

विशेष प्रतिनिधी/मुंबई

सोलापुरात काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही उमेदवार तरुण असल्याने सोलापुरात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. प्रणिती शिंदे यांची उमेदवारी अगोदरच जाहीर झाली. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी सुरू केली होती. परंतु भाजपमध्ये उमेदवारीबद्दल मंथन सुरू होते. अखेर त्यांनी राम सातपुतेला मैदानात उतरविले. त्यामुळे लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आता एका अटीवर त्यांचा प्रचार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष या नात्याने ते प्रचारात उतरल्यास प्रणिती शिंदे यांना फायद्याचे ठरणार आहे.

प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनीच आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच खुद्द प्रणिती शिंदे यांचे नेटवर्क जिल्ह्यात आहे. तसेच त्यांच्यामागे तरुण आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आहे. त्याच्या जोरावर त्यांनी सर्वत्र गाठीभेटी आणि कॉर्नरसभा घेऊन आपला जनसंपर्क वाढविला आहे. सोलापूर शहरातही त्यांचे नेटवर्क सक्षम आहे. वैयक्तिक नेटवर्क आणि माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मतदारसंघातील अभ्यास आणि रणनिती याच्या जोरावर जुन्याजाणत्या नेत्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी सुरू केली आहे. तसेच सोलापूरसह दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर आदी भागांत गावोगाव दौरे करून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यातच खुद्द सुशीलकुमार शिंदे यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे आणि त्यातच तरुणांची फळी प्रणिती शिंदे यांच्या मागे आहे. त्याच्या जोरावर त्यांनी प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा त्यांना नक्कीच फायदा होईल, असे बोलले जात आहे.

भाजप नेहमीच उमेदवारी घोषित करण्यात आघाडीवर असते. परंतु सोलापुरातील भाजपच्या सर्वेक्षणात प्रणिती शिंदे यांचे पारडे जडच असल्याचे समोर आल्याने उमेदवारीबाबत भाजपमध्ये संभ्रमाची स्थिती होती. मुळात या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. कारण भाजपचे शहरात सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख हे दोन आमदार आहेत. तसेच अक्कलकोटमध्येही भाजप आणि मोहोळमध्येदेखील महायुतीचेच आमदार आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद जास्त असल्याचे चित्र आहे. परंतु प्रत्यक्षात आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यात फारसे सख्य नाही आणि राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून महायुतीत ऐक्य राहणार का, हादेखील प्रश्न आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते किती जीव ओतून काम करतात, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात दोन्ही तरुण नेत्यांमध्ये ही लढत होणार असली तरी प्रणिती शिंदे यांचे नेटवर्क आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोर्चेबांधणी पाहता सद्यस्थितीत प्रणिती शिंदे यांचे पारडे जडच वाटते. परंतु आगामी काळात महायुतीचे नेते किती सक्षमपणे काम करतात आणि राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, यावर विजयाचे सर्व गणित अवलंबून आहे.

आडम मास्तरांना हवी सोलापूर मध्यची हमी

मागच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि माजी आमदार आडम मास्तर यांच्यात थेट लढत झाली. त्यामुळे दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होता. परंतु लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक म्हणून आपण प्रणिती शिंदे यांचा प्रचार करायला तयार आहोत. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य मतदारसंघ सोडण्याची हमी दिली पाहिजे, असे माजी आमदार आडम मास्तर यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास प्रणिती शिंदे यांना चांगला लाभ होऊ शकतो.

जुन्याजाणत्या नेत्यांनाही सोबत घेणे आवश्यक

सोलापुरात शिंदे यांना मानणारा जुनाजाणता वर्ग आणि नेते मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे प्रकाश एलगुलवार, शरद पवार गटाचे महेश कोठे, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यासह कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकजुटीने सोबत घेऊन सुशीलकुमार शिंदे हे त्यांना किती चार्ज करतात आणि ते किती सक्रिय होतात, यावरही मतदारसंघातील गणित अवलंबून आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in