काँग्रेसला आणखी एक धक्का; माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची पक्षाला सोडचिठ्ठी

उसेंडी यांनी या अगोदर दोनवेळा याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी उमेदवार बदलण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख नामेदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली.
काँग्रेसला आणखी एक धक्का; माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची पक्षाला सोडचिठ्ठी

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे एकामागून एक मोहरे विरोधी महायुतीच्या गळाला लागत आहेत. आता गडचिरोली-चिमूरचे माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला ओहे. ऐन निवडणुकीच्या टप्प्यातच अनेक नेते काँग्रेस पक्षाला सोडून जात असल्याने पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भाजपशी सक्षमपणे लढत देत असतात. तसेच काँग्रेसकडे पक्षाच्या नेत्यांचीही ताकद आहे. त्याच्या जोरावर भाजपला धक्के देता येऊ शकतात, या दृष्टीने यावेळी सर्वच नेते कामाला लागले आहेत. मात्र, विदर्भातील नेते काँग्रेसला सोडून विरोधी पक्षात जात असल्याने पक्षाचे बळ कमी होताना दिसत आहे. या अगोदर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, आमदार राजू पारवे आणि गडचिरोली जिल्ह्यातीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक डॉ. नितीन कोडवते यांसह बरेच नेते भाजप आणि शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उसेंडी यांनी या अगोदर दोनवेळा याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी उमेदवार बदलण्यात आला. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख नामेदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळीदेखील उसेंडी हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतु संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

डॉ. नामदेव उसेंडी हे २००८ पासून काँग्रेस पक्षात कार्यरत होते. २००९ मध्ये ते काँग्रेस पक्षात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून नामदेव किरसान या नव्या चेहऱ्याला काँग्रेसने मैदानात उतरविले. खरे तर यावेळीदेखील डॉ. नामदेव उसेंडी इच्छुक होते. परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. या अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे डॉ. नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा जिल्ह्यातील दुसरा धक्का आहे.

अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान यांच्यात लढत

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काँग्रेसने नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेते विरुद्ध किरसान यांच्यात लढत रंगणार आहे. काँग्रेसने यावेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे चुरशीची लढत होईल, असे मानले जात आहे. परंतु डॉ. नामदेव उसेंडी यांनी ऐनवेळी धक्का दिल्याने काँग्रेसला अधिक जोर लावावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in