माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
PM

माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विधानसभेत त्यांनी तालिका अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे अशी त्यांची ओळख होती.

सांगली : जनता दल (सेक्युलर) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड इथल्या घरी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असे मोठे कुटुंब आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

प्रा. शरद पाटील हे १९९० आणि १९९५ असे दोन वेळा कुपवाड-मिरज मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. शरद पाटील यांचा जनसंपर्क दांडगा होता. या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. पाटील यांनी २००२ ते २००८ मध्ये भाजपचे प्रकाश जावडेकर यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव केला होता.

शरद पाटील हे माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एचडी देवेगौडा यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. पाटील यांची क्षमता देवेगौडा यांनी हेरली होती. त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. अनेक सामाजिक चळवळींनाही त्यांचा मोठा आधार होता.

विधानसभेत त्यांनी तालिका अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे अशी त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली म्हणून कुपवाड शहरातील व्यापारी, दुकानदार व शाळांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in