माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

माजी आमदार व मनसेचे माजी सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर हे आपल्या अनेक सहकाऱ्यांसह आज उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.
माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

सिंधुदुर्ग : माजी आमदार व मनसेचे माजी सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर हे आपल्या अनेक सहकाऱ्यांसह आज (शुक्रवारी) उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.

मनसेतून दोन महिन्यांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडलेले उपरकर कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर आपल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 'उबाठा' पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार ते उद्या उद्धव ठाकरे यांची कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार आहेत. सेनेचे अन्य वरिष्ठ नेते यांच्याशीही त्यांची चर्चा होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उबाठा सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांची आज शुक्रवारी ३ मे रोजी कणकवली शहरात प्रचारसभा होणार असून त्याच वेळी त्यांच्या व सहकाऱ्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. उपरकर हे २००६ ते २०१२ या कालावधीत मूळ शिवसेनेचे विधान परिषद सदस्य होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ते सेनेतून बाहेर पडले व त्यांनी 'मनसे' प्रवेश केला. सुरुवातीला ते मनसेचे जिल्हाप्रमुख नंतर राज्य सरचिटणीस होते.

राज ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. दोन महिन्यांपूर्वी ते मनसेतून बाहेर पडले. मात्र पुढे काय हा प्रश्न होताच. अखेर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत स्वगृही परततील. त्यांच्या सोबत उद्या सावंतवाडी, कुडाल कणकवली, मालवण,आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in