
भास्कर जामकर /नांदेड
दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भेट घेतली. रात्री दहाच्या सुमारास मुंबईला रवाना होण्यापूर्वी आपला ताफा खतगावकर यांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी वळवून त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. चर्चा काय झाली; हे मात्र समजू शकले नाही, पण या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार होते. २०१४ साली त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता, नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा भास्करराव खतगावकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान खतगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला.
काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी आपली स्नुषा डॉ. मीनल पाटील-खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. मात्र, विधानसभेत डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड आणि परभणी दौऱ्यावर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा खतगावकर यांच्या निवासस्थानी वळवला. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
नांदेडच्या राजकारणात उलथापालथ होणार
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. दौऱ्या दरम्यान शिंदे हे देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देणार होते, मात्र, भेट झाली नाही. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भेट घेतली. भेटीचे कारण काय होते, बंद दाराआड काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही, पण या भेटीनंतर नांदेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे.