
उत्तर प्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सपाच्या माजी आमदाराच्या मुलाला वाराणसी व हडपसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत अटक केली. आरोपी हडपसर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला होता. पसार झालेल्या आरोपीची माहिती कळविणाऱ्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
विष्णू विजय मिश्रा (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णू मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील भदोईचे आमदार होते. सामूहिक बलात्कार प्रकरणात मिश्राचा सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान मिश्राचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती. १० दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले.
त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड दिला आहे. त्यानंतर त्याला घेऊन पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले.