मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; चाकूरकरांच्या स्नुषा अर्चनाताई भाजपमध्ये

लातूरमध्ये लिंगायत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तेच गणित घालून यावेळी काँग्रेसने लिंगायत समाजातील डॉ. शिवाजी काळगे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. परंतु त्याचवेळी लिंगायत समाजातील दोन नेते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; चाकूरकरांच्या स्नुषा अर्चनाताई भाजपमध्ये

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि उदगीरचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस नेते आणि उदगीर शहर आणि तालुक्यात चांगलीच पकड असलेले नेते राजेश्वरराव निटुरे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

लातूरमध्ये लिंगायत मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तेच गणित घालून यावेळी काँग्रेसने लिंगायत समाजातील डॉ. शिवाजी काळगे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. परंतु त्याचवेळी लिंगायत समाजातील दोन नेते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. परंतु मागच्या काही वर्षांत येथे भाजपने पकड निर्माण केली आहे. यावेळी भाजपने पुन्हा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी वेगळी खेळी करीत लिंगायत समाजातील डॉ. शिवाजी काळगे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून भाजपला धक्का देण्याची रणनीती आखली. त्यांना लातूर शहर आणि जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लातूरमध्ये परिवर्तन अटळ मानले जात होते. कारण जिल्ह्यात लिंगायत मतदार निर्णायक मानला जातो. मात्र, आता प्रचाराला वेग आलेला असतानाच शनिवारी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच उदगीरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते राजेश्वरराव निटुरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. लिंगायत समाजाचे दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने काँग्रेससाठी धक्कादायक बाब मानली जात आहे.

डॉ. अर्चनाताई चाकूरकर या प्रत्यक्ष राजकारणात नव्हत्या. परंतु सामाजिक कार्यातून त्यांनी गेल्या २५ वर्षांत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यासोबतच त्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा असल्याने त्यांनी राजकारण जवळून पाहिले आहे. त्यामुळे भविष्यात भाजप त्यांना पाठबळ देऊन लातूर शहरात पर्याय देण्याचा विचार करू शकते, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. अगोदरच भाजपने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांना घेरण्याची रणनीती आखायला सुरुवात केली होती. मात्र, तरीही नेत्यांचे बळ कमी पडत होते. मात्र, आता थेट काँग्रेसचे बडे नेते चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई यांना सोबत घेऊन लातूर शहर मतदारसंघ आणि जिल्ह्यात एक वेगळी राजकीय खेळी खेळण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. त्यादृष्टीने चाकूरकर आणि निटुरे यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

अमित देशमुख यांना घेरण्याचा प्रयत्न

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये चांगलीच पकड आहे. ते भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु ते भाजपमध्ये येणार नाहीत, असे लक्षात आल्यानंतर आता त्यांना घेरण्याची रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरराव निटुरे यांना भाजपमध्ये घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच खुद्द फडणवीस यांनी अर्चनाताईंच्या रूपाने लातुरात आम्हाला मजबूत नेतृत्व मिळाल्याचे सांगितले.

विधानसभेला उमेदवारी देणार?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ भाजपने घातली होती. त्यावेळी कदाचित पक्षप्रवेश केला असता तर आम्ही त्यांना लातूरमधून मैदानात उतरविले असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या मान्य केले. याचाच अर्थ आगामी निवडणुकीत त्यांना लातूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाऊ शकते, असेच संकेत यावेळी देण्यात आले.

लिंगायत मतदारांवर लक्ष

लातूर जिल्ह्यात आणि शेजारच्या जिल्ह्यांतही लिंगायत मतदार मोठ्या संख्येने आहे. अर्थात या भागात हा मतदार निर्णायक ठरू शकतो, याचा अंदाज भाजपला आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेतही होऊ शकतो, हेच गणित घालून या अगोदर माजी मंत्री तथा औशाचे माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर आता अर्चनाताई पाटील, राजेश्वरराव निटुरे या लिंगायत समाजाच्या नेत्यांना सोबत घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in