मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांच्यामध्ये मंत्रिपद वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत जिंकलेल्या जागांनुसार २१-१२-१० चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुतीने राज्यात २३६ जागा जिंकल्या. त्यातील १३२ जागा भाजप, शिवसेना ५७ व राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यासाठी तिन्ही पक्षांनी नवीन फॉर्म्युला तयार केल्याचे कळते. भाजपचे २१, शिंदेंच्या शिवसेनेचे १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे १० जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात ४३ जणांनाच मंत्री बनवण्याची तरतूद आहे.
मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावे व फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दिल्लीला जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असेल.
महायुतीतील तीन पक्षांनी जिंकलेल्या जागांनुसार, मंत्रिपदांचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद असू शकते.
महायुतीतील तीनवेळा निवडणूक जिंकलेल्या आमदाराने सांगितले की, सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्यास भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला २२ ते २४ मंत्रिपदे मिळू शकतात. शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना १० ते १२ मंत्रिपदे, तर अजित पवार गटाने ४० जागा जिंकल्याने त्यांना ८ ते १० मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
मंत्रिमंडळाचा बुधवारी शपथविधी?
महायुतीतील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदाचा अजूनही निर्णय घेतलेला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतर हे नाव निश्चित होऊ शकते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दिल्यानंतर महायुतीचा नेता सरकार स्थापनेचा दावा करेल. त्यामुळे येत्या बुधवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच
विशेष म्हणजे, भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, तर शिवसेना (शिंदे) यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वात चांगला आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री बनू शकतात, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.