पावसाचा हाहाकार! परभणीत चौघांचा मृत्यू; नांदेड, हिंगोली, बीड, लातूरमध्ये थैमान

बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने माैसमी पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड व लातूरसह मराठवाड्याच्या विविध भागात पाऊस अक्षरश: कोसळत आहे.
पावसाचा हाहाकार! परभणीत चौघांचा मृत्यू; नांदेड, हिंगोली, बीड, लातूरमध्ये थैमान
Published on

नांदेड/संभाजीनगर : बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने माैसमी पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड व लातूरसह मराठवाड्याच्या विविध भागात पाऊस अक्षरश: कोसळत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने परभणीत चौघांचा बळी घेतला असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेडच्या २६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले. पैनगंगेला पूर आल्याने नांदेड-हदगाव, माहूर व किनवट तसेच सीतानदीला पूर आल्यामुळे मुदखेड-उमरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सहस्रकुंड धबधब्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले. हिंगोलीतही पाऊस सुरू असून, परभणीच्या पाथरीतील मुदगल धरणाचे दोन दरवाजे उघडले. मंठ्यात पिके आणि गावांत चार ते पाच फूट पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे रविवार आणि सोमवारी परतणारी देवगिरी एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात आली आहे. हिंगोलीत पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने २५ कुटुंबांमधील २०० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

नांदेडला मोठा फटका

नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नांदेड जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदील झाला आहे. किरकोळ विक्रेते तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, नांदेड शहरातील तीन पुल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून, पावसामुळे देवगिरी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे. गोदावरी नदी, पैनगंगा नदी, आसना, मन्याड, लेंडी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या लोकांना तसेच गावांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक सतत सुरू आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून एक लाख ४६ हजार ४४७ क्यूमेक्स पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी भरून वाहत आहे. गोदावरी नदी काठावरील शहरातील अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्याला ऑरेंज, तर ठाणे व पालघर वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट कुलाबा वेधशाळेने दिला आहे. रविवारी परभणी येथे ९४, बीड ४६, वाशिम ३१ मिमी पाऊस झाला. सोमवारी मराठवाड्यासह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. संभाजीनगरात रविवारी रात्री पावसाला सुरुवात झाली़ शहरातील मुकुंद वाडी येथील घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. हिंगोलीत शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू असून कयाधू नदीला पूर आला आहे़ पावसाचे पाणी वस्त्यांमध्येही शिरले आहे.

परळी-सिरसाळा मार्गावरील वाण नदीवर पांगरी येथे उभारलेला तात्पुरता पूल रविवारी सायंकाळी वाहून गेल्याने परळी-बीड धरणातील साठा सोमवारी सायंकाळी ९० टक्क्यांवर पोहोचला होता. पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदीत पाणी सोडले आहे. आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परभणीत ३१४ मिमी पावसाची नोंद

परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३१४ मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत ४ जणांना प्राण गमवावे लागले़ संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

जवळपास ६३ गावांना या पावसाचा जबर फटका बसला़ पावसामुळे केवळ घरांचेच नुकसान झालेले नसून, ४५ हेक्टर शेतीचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तवला आहे. या पुरात गुरे आणि पाळीव प्राण्यांनाही जीवाला मुकावे लागले आहे.

मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला

जायकवाडी धरण ९५ टक्के भरल्याने मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. सध्या जायकवाडी धरणात १९,६०३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने माजलगाव धरणासाठी विसर्ग वाढविला आहे़.

शेतीचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी

नांदेड जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिले आहे. नांदेडमधील अतिवृष्टीच्या संदर्भात सोमवारी पालक मंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.

logo
marathi.freepressjournal.in