कन्नड घाटात कार दरीत कोसळून चार ठार

अक्कलकोट येथून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
कन्नड घाटात कार दरीत कोसळून चार ठार

चाळीसगाव : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवारी पहाटे कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी मालेगाव येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण अक्कलकोट येथून देवदर्शन करून गावी परतत होते.

अक्कलकोट येथून देवदर्शन करून तवेरा कारने मालेगाव येथे परतत असताना पाऊस, धुके असल्याने कारचाकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने व तुटलेल्या कठड्यामुळे कार दरीत कोसळली. घाटातील जय मल्हार पॉइंट, जुना लाकडी पूल येथे अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग पोलीस, चाळीसगाव शहर, ग्रामीण पोलीस या तीन पथकांनी व स्थानिक प्रवाशांनी रात्रीच जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सकाळी सात वाजेपर्यंत मदतकार्य चालले. त्यातच घाटातील मेणबत्ती पॉइंटवर दरड कोसळली. मोठे दगड, माती रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला. त्यामुळे जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात अडथळे निर्माण झाले. हे दगड, माती हटविण्यासाठी पथकाने शर्थ केली. पाऊस, धुके आणि अंधार यामुळे मदतकार्य जिकरीचे व आव्हानात्मक झाले.

मृतांमध्ये प्रकाश गुलाबराव शिर्के (६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (६०), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (३५), पूर्वा गणेश देशमुख (८) यांचा समावेश आहे. अपघात झाल्यानंतर जखमी अनुष धर्मेंद्र सूर्यवंशी हा तीनशे फूट दरीतून वर आला व त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मदतीसाठी याचना केली. काही प्रवाशांनी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिसांचे संपर्क साधला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस पथक चाळीसगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

logo
marathi.freepressjournal.in