
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सणबुर येथे गुरुवारी रात्र एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत तर्त वितर्क लढवले जात आहेत. पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु असून लवकरत या कुटुंबाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार सणबूर ता. पाटण येथील आनंदा पांडुरंग जाधव, त्यांची पत्नी सुनंदा जाधव, मुलगा संतोष जाधव, विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस हे चारही जण झोपलेल्या स्थितीत मयत आढळून आले आहेत.
आनंद जाधव आजारी असल्याने त्यांना गुरुवारी कराडच्या कृष्णा हॉस्पिटल येथे हलविण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आलं. रात्री सणबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची आणि लाईट नसल्यामुळे जनरेटरची देखील सुविधा देण्यात आली होती. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असे तिघे जण होते. पुष्पलता यांच्या मुलाने रात्री फोनरुन आजोबा आनंद जाधव यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
शुक्रवारी सकाळी पुन्हा त्याने फोन केला, मात्र संपर्क झाला नाही. यावेळी त्याने शेजारील व्यक्तींना घरी विचारपूस करण्यास सांगितले. काही लोक घरी गेले असता दरवाजा आतून बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहीले. यावेळी चारही जण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले दिसले. पोलीसांकडू या घटनेचा तपास केला जात आहे.