चंद्रपूरमध्ये चार मित्रांवर काळाचा घाला ; सेल्फीच्या नादात तलावात बुडून चौघांचा मृत्यू

तीन जणांचा मृत्यू हा मित्राला वाचवण्याच्या नादात झाल्याचं सांगण्यात येत आहे
चंद्रपूरमध्ये चार मित्रांवर काळाचा घाला ; सेल्फीच्या नादात तलावात बुडून चौघांचा मृत्यू
Published on

चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या २४ तासात सरासरी ४७ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. तर पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रात्रभर सुरु असलेल्या या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून तुडूंब भरुन वाहु लागले आहेत. या अतिवृष्टी सदृश्य पावासामुळे चंद्रपुर जिल्हाातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे पांजरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आल्याने सकाळीच्या सुमारास गावाला पुराचा वेढा पडला. यामुळे गावातील काही घरात पुराचं पाणी शिरलं आहे.

अशात चंद्रपूरमध्ये एक दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत चार लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. सेल्फीच्या नादात चार मित्रांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू हा मित्राला वाचवण्याच्या नादात झाल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी सिंचन तलावावर ही घटना घडली आहे. पावसाळा सुरु झाल्याने आठ तरुण सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला, यावेळी त्याला वाचवायला तलावात उतरलेल्या तीघांनी देखील आपले प्राण गमावले आहेत.

या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या स्थानिक मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने तरुणांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. चंद्रपूर जिल्हास्थानाहून अधिक बचाव कुमक शोधकार्यासाठी मागवण्यात आली आहे.

मालाडमध्ये तिघांचा बुडून मृत्यू

रविवार सुट्टीचा दिवस समुद्र किनारी पाण्याचा आनंद लुटण्यासाठी चार ते पाच मुलं मालाड पश्चिम येथील मार्वे बीचवर गेली होती. जवळपास अर्धा किलोमीटर आत गेलेल्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ती रविवारी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच तेथे असलेल्या अन्य पर्यटकांनी दोघा मुलांना बाहेर काढलं. मात्र उर्वरित तिघांचा शोध लागला नसून कोस्ट गार्ड, नेव्ही, अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in