विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीत चुरस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार उभा केला आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीत चुरस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार उभा केला आहे. शिंदे गटाच्यावतीने मुंबई पदवीधरमधून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीत चुरस वाढली आहे. काँग्रेसने देखील विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कीर हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून २०२४ अशी आहे. शिंदे गटाचे उमेदवार दीपक सावंत हे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकालामुळे सावंत यांनी बुधवारी कोकण भवन येथे जाऊन मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकसभा निवडणूक एकत्र लढविणाऱ्या महायुतीने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपापले उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीत यावर एकमत नसल्याचे उघड झाले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून २०२४ आहे. या मुदतीत महायुतीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला नाही तर विधान परिषदेसाठी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महायुतीत चुरस मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने विधान परिषदेच्या कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार तर मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांनी अनुक्रमे मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर नाशिक शिक्षकमधून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in