नांदेड : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत नांदेड विभागातील हिमायतनगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. याची पायाभरणी तसेच ४८ उड्डाण पूल, भुयारी पूलाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ( दि. २६) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी रविवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना निती सरकार म्हणाल्या, रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानके अपग्रेड करण्यासाठी एक मोठे परिवर्तन सुरू आहे. "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. आता यामध्ये आणखी ५५४ स्टेशनसाठी पायाभरणी केली जाणार आहे.
‘ही’ कामे होणार :
नांदेड विभागतील चार स्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे. यात रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, दर्शनी भाग आणि सौंदर्यदृष्ट्या सुखकारक प्रवेशद्वार, किफायतशीर पोर्चेसची निर्मिती, रस्त्यांचे रुंदीकरण, योग्यरीत्या डिझाइन केलेले चिन्ह, समर्पित पादचारी मार्ग, सुनियोजित पार्किंग क्षेत्र, सुधारित प्रकाश, लँडस्केपिंग, हिरव्या पॅचची निर्मिती यासह 'एक स्टेशन एक उत्पादन' योजनेसाठी स्टॉल निश्चिती, हाय लेवल प्लॅटफॉर्म आणि पुरेशा प्लॅटफॉर्म शेडचे बांधकाम उच्च दर्जाची सार्वजनिक घोषणा प्रणाली, एलईडी आधारित स्थानकाचे नाम फलक, वेटिंग हॉलमध्ये सुधारणा, वापरकर्ता अनुकूल चिन्हे इत्यादीसारख्या प्रवासी सोयीसुविधांची तरतूद करण्यात येणार आहे, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी सांगितले.