गणपतीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ४ हजार ३०० बसेस; कसे कराल रिझर्व्हेशन?

गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.
गणपतीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ४ हजार ३०० बसेस; कसे कराल रिझर्व्हेशन?
Published on

मुंबई : गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाने ८०० बसेस अधिक सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी हे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.

कसे कराल रिझर्व्हेशन?

सदर बसेस आरक्षणासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन या ॲॅपव्दारे उपलब्ध होणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३ हजार ५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in