वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार; चंद्रपूर जंगलातील भयंकर घटना

जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल ४ महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे.
वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार; चंद्रपूर जंगलातील भयंकर घटना
वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार; चंद्रपूर जंगलातील भयंकर घटना(प्रातिनिधिक फोटो)
Published on

चंद्रपूर : जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल ४ महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलात वाघाने ३ महिलांचा बळी घेतला होता. त्यानंतरही ही दुसरी मोठी घटना आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या महिलांचा बळी हा प्रशासकीय अनास्थेने केलेला घात असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. गुंजेवाही येथील १३ महिलांचा एक समूह तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेला होता. तेंदूपत्ता वेचण्याचे काम सुरू असताना या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या. पण वाघिणीने ४ महिलांवर झडप घातली. त्यात त्यांचा बळी गेला. इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात आली. तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

गतवर्षी ३ महिलांचा बळी

या घटनेमुळे गतवर्षी मेंढा (माल) घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या असून, तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गतवर्षी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा (माल) जंगलात वाघाने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला होता. त्यात ३ महिलांचा बळी गेला होता. त्यानंतर शुक्रवारच्या हल्ल्यात तब्बल ४ महिलांचा बळी गेला आहे.

प्रशासकीय अनास्थेने केलेला घात : विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या महिलांचा बळी हा प्रशासकीय अनास्थेने केलेला घात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही आजचा नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरिबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहे.

इतर सर्व महिला सुखरूप

गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे ४ महिलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी इतर महिला सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभागानेही घटनास्थळी पोहोचून स्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील तपास सुरू केला. या घटनेत कवडूबाई दादाची मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) व सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) या ४ महिलांचा बळी गेला. यामुळे मोहुर्ले व चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in