चौथ्या टप्प्यातील मतदान आज; रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंसह २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९६ मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान आज; रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंसह २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९६ मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होणार असून, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, तसेच पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, सुजय विखे यांच्यासह २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा शनिवारी सायंकाळी प्रचार थंडावला. सर्वच मतदारसंघात यावेळी महायुती व महाविकास आघाडीत अत्यंत चुरशीची निवडणूक होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले आदी नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे राजकारण तापले होते. संभाजीनगर, मावळ आणि शिर्डी या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात सामना रंगला आहे. तर शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने आहेत. संभाजीनगरमध्ये नेहमीप्रमाणे तिरंगी लढत होत आहे.

मावळमध्ये सर्वाधिक मतदार

राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात एकूण २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार मतदानास पात्र आहेत. या ११ मतदारसंघापैकी मावळमध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लाख ८५ हजार १८ मतदार मतदानास पात्र आहेत. तर सर्वात कमी मतदार शिर्डीत असून त्यांची संख्या १६ लाख ७७ हजार ३३५ इतकी आहे. या ११ मतदारसंघात एकूण २९८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

राज्यात आधीच्या टप्प्यातील मतदानात फारसा उत्साह दिसून आलेला नाही. मतदानाची टक्केवारी जवळपास मागील मतदानाइतकीच आहे. राज्यातील गेल्या पाच वर्षांतील एकूणच राजकीय परिस्थिती तसेच उन्हाचा वाढता पारा ही ढोबळमानाने त्याची कारणे असल्याचे मानण्यात येत आहे.

प्रमुख लढती

 • नंदुरबार (११) डॉ. हिना गावित (भाजप)

 • गोवाल पाडवी (काँग्रेस)

 • जळगाव (१४) स्मिता वाघ (भाजप)

 • के बी पाटील (शिवसेना ठाकरे)

 • रावेर (२४) रक्षा खडसे (भाजप)

 • श्रीराम दयाराम पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)

 • जालना (२६) रावसाहेब दानवे (भाजप)

 • कल्याण काळे (काँग्रेस)

 • औरंगाबाद (३७) संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे)

 • चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे)

 • इम्तियाज जलील (एमआयएम)

 • मावळ (३३) श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे)

 • संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे)

 • पुणे (३५) मुरलीधर मोहोळ (भाजप)

 • रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

 • शिरुर (३७) अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार)

 • शिवाजीराव आढळराव (राष्ट्रवादी अजित पवार)

 • अहमदनगर (२५) सुजय विखे (भाजप)

 • निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)

 • शिर्डी (२०) सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे)

 • भाऊसाहेब वाघचौरे (शिवसेना ठाकरे)

 • बीड (४१) पंकजा मुंडे (भाजप)

 • बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी शरद पवार)

राज्यातील या ११ जागांसाठी मतदान

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदारसंघात २९ हजार २८४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सर्वाधिक ४१ उमेदवार बीड मतदारसंघात असून, सर्वात कमी ११ उमेदवार नंदुरबार मतदारसंघात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in