“पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”; भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना फडणवीस नेमकं काय म्हणाले?

"मुंबईचा विचार केल्यास मविआला ४ जागा आणि आम्हाला २ जागा मिळाल्या. पण,२६ लाख ६७ हजार मतं महायुतीला आणि महाविकास आघाडीला २४ लाख ६२ हजार मतं मिळाली...."
“पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं”; भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना फडणवीस नेमकं काय म्हणाले?

"महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व भाजपकडून मी करत होतो. त्यामुळे जो काही पराभव म्हणा किंवा कमी जागा आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वतः यामध्ये कमी पडलो", असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दोन आकडी जागाही गाठता आल्या नाहीत आणि अवघ्या ९ जागा त्यांच्या पदरी पडल्या. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं.

मी पळून जाणारा माणूस नाही...

"मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वतः यामध्ये कमी पडलो आणि ती कमतरता भरून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात जो काही सेट बॅक सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो आणि मी पक्षनेतृत्वाला अजून एक विनंती करणार आहे की, आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचे आहे, त्यामुळे त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी जेणेकरुन ज्या काही कमतरता राहील्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहीलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचंय ते आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणारच आहे. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढचं पाऊल उचलेन", असे फडणवीस म्हणाले. मी पळून जाणारा माणूस नाही. मी या पराभवाची जबाबदारी घेतो. भाजप पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमाने काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

मविआसोबतच 'नरेटीव्ह'शीही आमची लढाई होती-

संपूर्ण इंडी आघाडीपेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. पुढे बोलताना, "महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा आम्हाला महाराष्ट्रात मिळाल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांसोबतच काही प्रमाणात नरेटीव्हशीही आमची लढाई होती. ज्यामध्ये संविधान बदलणार अशाप्रकारचा जो नरेटीव्ह तयार केला होता, तो नॅरेटीव्ह ज्या प्रकारे थांबवायला पाहिजे होता, त्याप्रमाणे आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे. जनतेने जो जनादेश दिलेला आहे, तो शिरसावंद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचेही मी अभिनंदन करतो", असे ते म्हणाले.

अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरकाने १७ आणि ३० असे आकडे -

महाराष्ट्रात मविआला जवळपास ३० जागा मिळाल्या, त्यांना मिळालेलं मतदान आहे ४३.९१ टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे ४३.६० टक्के. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरकाने १७ आणि ३० असे आकडे दिसत आहेत. मतांमध्ये बघितल्यास मविआला २ कोटी ५० लाख मतं मिळालीत. महायुतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली. २ लाख ३ हजार १९२ मते त्यांना आमच्यापेक्षा जास्त मिळाली. मुंबईचा विचार केल्यास मविआला ४ जागा आणि आम्हाला २ जागा मिळाल्या. पण,२६ लाख ६७ हजार मतं महायुतीला आणि महाविकास आघाडीला २४ लाख ६२ हजार मतं मिळाली. मुंबईत आम्हाला २ लाख मतं जास्त मिळाली आहेत. ८ जागा ४ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने हरलो. ६ जागा ३० हजार आणि काही जागा त्याहून कमी फरकाने हरलो. गेल्या वेळीपेक्षा दीड टक्क्याने आमची मतं कमी झाली आणि २३ वरुन जागा ९ वर आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. संविधान बदल, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांचाही फटका बसल्याचे त्यांनी मान्य केले.

logo
marathi.freepressjournal.in