बुलढाणा : कुणीतरी माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेले नाव दुसऱ्याच कुणाला तरी दिले. आज लोकशाही आहे. त्यामुळे मी सुद्धा लोकशाहीच्या अधिकारात निवडणूक आयोगाचे नाव बदलून ‘धोंड्या’ असे ठेवतो, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही आणि एकाधिकारशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी बुलढाणा दौऱ्यात केले.
“महाराष्ट्राची जिद्द गेली कुठे? बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचे जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला एवढे मोठे दैवत दिले, त्यांना आपण विसरलो. अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द ज्या दैवताने दिली त्यांचे मातृस्थान या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येकडे वळत असेल आणि गद्दार टिमकी वाजवत असेल तर बुलढाणाकरांना तरी जिजाऊंचे नाव घेण्याची योग्यता नाही. जिजाऊलाही समाधान वाटले पाहिजे की, मी ज्या तेजाला जन्म दिला त्याचा प्रकाश संपूर्ण देशावर पडला. पण मी जिथे जन्मले तिथेच प्रकाश पडणार नसेल तर उपयोग काय माझ्या आयुष्याचा? कशाला म्हणायचे जय जिजाऊ...” अशी भावनिक सादही त्यांनी शेतकऱ्यांना घातली. “स्वातंत्र्यलढ्याशी कोणताही संबंध नसणाऱ्यांच्या पदरात तुम्ही पुन्हा भारतमाता टाकणार का? असे करायचे नसेल तर येथून पुढे केवळ आपल्या शिवसेनेलाच मतदान करा. मी गद्दारांची शिवसेना मानत नाही. शिवसेना ही आमचीच असून, ती आमचीच राहणार,” असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
ते म्हणाले की, “भाजपवाले म्हणतात की, ते घराणेशाहीच्या विरुद्ध आहेत, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. अमित शहा यांचा मुलगा जय शहा बीसीसीआयच्या सचिवपदी आहे. माझे घराणे अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. पण अमित शहा यांचे क्रिकेटमध्ये काय योगदान आहे? जय शहा विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील मॅच अहमदाबादला नेणे एवढेच त्याचे कर्तृत्व,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.