बेबी केअर किटसाठी २४ कोटींचा निधी; सरकारी रुग्णालयात प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना

नवजात शिशूंसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बेबी केअर किटचे वाटप करण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षात तब्बल २४ कोटी ७७ लाख रुपयांचे बेबी केअर किट खरेदी करण्यात आले.
बेबी केअर किटसाठी २४ कोटींचा निधी; सरकारी रुग्णालयात प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना
Published on

मुंबई : नवजात शिशूंसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बेबी केअर किटचे वाटप करण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षात तब्बल २४ कोटी ७७ लाख रुपयांचे बेबी केअर किट खरेदी करण्यात आले. नवजात शिशूंच्या देखभालीसाठी मातांना बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती झालेल्या नवजात बालकांच्या मातांना शासनातर्फे दोन हजार रुपयांपर्यंत 'बेबी केअर किट' सन २०१९ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व प्रसूत झाल्यानंतर २ महिन्यांच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर किटचे वाटप करण्यात येते. महिलांची प्रसूती अधिकाधिक प्रमाणात सरकारी रुग्णालयात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये नवजात मुलाला आईचे दूध व योग्य पोषण मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सन २०२४ - २५ या आर्थिक वर्षात बेबी केअर किट खरेदी करण्यात आली असून त्यासाठी कंत्राटदार कंपनीला २४ कोटी ७७ लाख रुपये अदा करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

बेबी केअर किटमधील साहित्य

मुलाचे कपडे, छोटी गादी, टॉवेल, प्लास्टिक डायपर, मालिश तेल, थर्मामीटर, मच्छरदाणी, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट, शॅम्पू, नेलकटर, हातमोजे, पायमोजे, बॉडी वॉश लिक्विड, हँड सॅनिटायझर, आईसाठी गरम कपडे व छोटी खेळणी या साहित्यांचा बेबी केअर किटमध्ये समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in