
पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. वेळापत्रकानुसार येत्या ३० जून रोजी पहिल्या नियमित फेरीचे ॲॅलॉटमेंट अधिकृत पोर्टलवर जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थी आणि कॉलेज लॉगइनमध्ये ते दाखविले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना याबाबतचे एसएमएस पाठविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलै या कालावधीत मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला असून, विद्यार्थी व पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागातर्फे इन हाऊस कोटा व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोटय़ातील प्रवेश जाहीर करण्यात आले. आता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. तसेच महाविद्यालयांनी कोटानिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्याचप्रमाणे विनंती अर्ज करून झालेला प्रवेश रद्द करता येणार आहे. त्यानंतर नऊ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.