शिवाजी पार्कसाठी राजकीय पक्षांचे रणकंदन; प्रचार सभेसाठी मैदानाकडे धाव

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही पक्षांचा तिकीट वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तरीही शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांनी आतापासून दावा करण्यास सुरुवात केली आहे. सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी व ठाकरेंच्या शिवसेनेने पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज दाखल केला आहे.
शिवाजी पार्कसाठी राजकीय पक्षांचे रणकंदन; प्रचार सभेसाठी मैदानाकडे धाव
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मोठमोठ्या प्रचार सभांचे आयोजन राजकीय पक्षांकडून होऊ लागले आहे. दादर येथील शिवाजी पार्क हे सर्वच राजकीय पक्षांना हवेहवेसे वाटत असते. याच मैदानावर प्रचार सभा घ्यायला भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी व ठाकरेंची सेना यांच्यात रणकंदन माजले आहे. प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मिळावे, यासाठी तिन्ही पक्षांनी अर्ज केल्याचे पालिकेच्या ‘जी’ उत्तर विभागाने सांगितले, तर ठाकरेंच्या शिवसेनेने आगामी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र प्रचार सभेसाठी परवानगी देण्यास काही निर्बंध असल्याने प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सभेसाठी मनसेने अर्ज केला असून त्यांना परवानगी मिळाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही पक्षांचा तिकीट वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तरीही शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांनी आतापासून दावा करण्यास सुरुवात केली आहे. सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी व ठाकरेंच्या शिवसेनेने पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र शिवाजी पार्क मैदान ४५ दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशी देण्यावर उच्च न्यायालयाचे निर्बंध असल्याने परवानगीबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल. यासाठी नगर विकास विभागाला अर्ज सादर करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने सांगण्यात आले.

दसरा मेळाव्यासाठी ठाकरे सावध

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे गेली दोन वर्षे अर्ज केला होता. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदानाचे अतूट नाते आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून दसरा मेळावा साजरा केला जातो. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी दिली होती. मात्र यंदा ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी आताच अर्ज केला आहे.

आम्ही अर्ज करणार नाही - सदा सरवणकर

शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा साजरा न करता अन्य ठिकाणी साजरा करावा, असा निर्णय मागील वर्षीच घेतला आहे. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्क मैदान हवे असल्यास अर्ज करु, पण भाजप सोबत असल्याने शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यात काही अडचण येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in