

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तीने केलेल्या भीषण हल्ल्यात एका ३८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या संदर्भातील माहिती दिली.
मेंढा गावचे रहिवासी असलेले धनराज मडावी हे बुधवारी संध्याकाळी ६:३० वाजताच्या सुमारास आपल्या काही साथीदारांसह सायकलने चांदालाकडे जाणार्या रस्त्यावरून घराकडे परतत होते. हत्तीला समोर पाहताच मडावी यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांनी आपल्या सायकली तेथेच टाकून सुरक्षित ठिकाणी पळ काढला, मात्र मडावी यांना वेळेत पळून जाण्यात यश आले नाही.
हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांना आपल्या सोंडेत पकडले आणि जमिनीवर आपटून पायदळी तुडवले. या भीषण हल्ल्यात मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.