चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

येत्या बुधवारी गणेश चतुर्थीला घरोघरी घरगुती गणपतीचे आगमन होते आहे. त्यानिमित्त लाखो कोकणवासीयांनी आपल्या लाडक्या गणरायाची सेवा करायला रेल्वे, एसटी-खासगी बस, खासगी गाड्यांनी शनिवारीच कूच केले.
चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या
Published on

मुंबई : गौरी-गणपतीचा सण म्हणजे कोकणी मुलुकातील जनतेच्या श्रद्धेचा उत्सव. काहीही झाले तरी गरीब, श्रीमंत कोकणवासीय गणपतीला गावाला जातोच. गणपती घरी येणार म्हणजे, कोकणातील घराघरात जणू दिवाळीच. येत्या बुधवारी गणेश चतुर्थीला घरोघरी घरगुती गणपतीचे आगमन होते आहे. त्यानिमित्त लाखो कोकणवासीयांनी आपल्या लाडक्या गणरायाची सेवा करायला रेल्वे, एसटी-खासगी बस, खासगी गाड्यांनी शनिवारीच कूच केले.

कोकणात यंदा जाण्यासाठी भारतीय रेल्वेने ३८० विशेष गाड्या सोडल्या आहेत. तसेच एसटीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ४४७९ बसेसचे समूह बुकिंग फुल्ल झाले आहे. त्याप्रमाणे, मुंबई सेंट्रल, दादर, परळ, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, कल्याण येथून एसटी बस गाड्या चालवण्यात येत आहेत. यंदाच्या पालिका निवडणुका लक्षात घेता आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोफत एसटी बसेस सोडल्या आहेत. एकट्या मुंबई भाजपने ३५० एसटी बसेस सोडल्या आहेत. शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातून (बीकेसी) या एसटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला, तर ठाण्यातून २६७१ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यातील २३०१ एसटी बस राजकीय नेत्यांकडून पाठवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही सेवा चक्क मोफत आहे. पेण एसटी डेपोतून २००, तर छत्रपती संभाजीनगरमधून २८५ एसटी बसेस कोकणात सोडल्या जाणार आहेत.

रेल्वेकडून ३८० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांचे पहिले प्राधान्य आता रेल्वेला असते. रेल्वेने यंदा भाविकांसाठी ३८० विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्या सोडण्याचा आतापर्यंतचा विक्रम आहे. दोन महिन्यांपूर्वी या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्या सोडून या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. या रेल्वे गाड्या गर्दीने फुल्ल झाल्याचे दिसून येत आहेत. कारण रेल्वेचा प्रवास हा आरामदायी व वेगवान आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास

गेल्या १६ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून खड्ड्यातून कोकणवासीयांना प्रवास करावा लागत आहे. मुंबईतून हजारो प्रवासी आपल्या कुटुंबासह आपल्या खासगी गाडीने निघाले आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवानिमित्त खासगी गाड्यांना टोलमाफी दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात केले आहेत. रस्त्यात गाड्या बंद पडल्यास क्रेनची व्यवस्था केली आहे. तसेच अनेक कोकणवासीय मुंबई-गोवा महामार्गावरील खडतर प्रवास टाळण्यासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गाने प्रवास करत आहेत.

कोकणात हजारो कोकणवासीय दाखल

यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असल्याने हजारो कोकणवासी दाखल होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, वडोदरा, सुरत, अहमदाबाद येथे राहणारे कोकणवासीय आपापल्या घराकडे निघाले आहेत. यामुळे कोकणात गावे व कुलूपबंद घरे या उत्सवाच्या निमित्ताने गजबजली आहेत. कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याने शहरांपेक्षा गावोगावच्या उत्सवात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो.

मेट्रो १२ वाजेपर्यंत धावणार

मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाची क्रेझ असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला आहे. आता मेट्रो लाइन-२अ (अंधेरी पश्चिम-दहिसर) तसेच मेट्रो लाइन-७ (गुंदवली-दहिसर) या मार्गिकांवरील गाड्या रात्री ११ ऐवजी १२ वाजेपर्यंत धावतील. ही विशेष सेवा २७ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या गणपतीच्या ११ दिवसांसाठी उपलब्ध असेल. प्रत्येक दिवशी जवळपास १२ फेऱ्या अधिकच्या चालवल्या जातील.

मुंबई परिसरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला असताना शनिवारी मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी उसळली. दादर, गिरगाव, परळ, वरळी, ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली येथील बाजारपेठांत शनिवारी सायंकाळी मोठी गर्दी जमली होती. गणपतीला लागणारे सजावटीचे साहित्य, नारळ, मोदक, कंठी, हार, पूजेचे साहित्य, फळे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या दुर्वा, जास्वंद, गुलाब, अस्टर, शेवंती फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारी कापडी तसेच प्लास्टिकची फुले आणि त्यासाठी लोखंडी सांगाडा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. कापडी तसेच प्लास्टिकची फुलांचे पट्टे १ हजार ते १२०० रुपयांना, तर लोखंडी सांगाडे १२०० पासून विकले जात आहेत. गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. बाप्पाची आरास, सजावटीसाठी लागणारी तोरणं, फुलांच्या माळा, पडदे, झालर, इलेक्ट्रॉनिक्स तोरणं, लाईट्स, धूप, कापूर, अगरबत्ती यांसह गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in